राग भैरवी Raag Bhairavi

भैरवी…
.
लहान असताना घरी कुणी नात्यातलं, ओळखीतलं आलेलं माणूस गाणं वगैरे म्हणणारं असेल तर त्याला म्हणायचा आग्रह व्हायचा. मोठ्या माणसांकडून शेवटी 'एक झकास भैरवी होऊ दे' असं म्हटलं जायचं. तो 'राग' आहे वगैरे गोष्टी काही ठाऊक नव्हत्या. चिमुकला मेंदू (अजूनही तेवढाच आहे, उत्क्रांती काहीही नाही) विविध शक्यता तपासात बसायचा. मागच्यावेळेला अभंग होता भैरवी म्हणून यावेळी वेगळंच गाणं कसं भैरवी म्हणून असे अज्ञानी प्रश्नं पडायचे. मैफिलीच्या शेवटी म्हटला जाणारा राग असं नंतर समजलं. मग आयुष्याच्या संध्याछायेला पण भैरवी म्हणायची वेळ आली वगैरे असं झालं. एकदा शिक्का बसला की बसला, तसं झालंय भैरवीचं. अपभ्रंश, अर्धवट माहितीवर आधारित पायंडे, कालबाह्य प्रथा सहसा बदलत नाहीत, उलट त्या नेमाने पाळल्या जातात. क्रॉफर्ड मार्केटच्या उत्तरेला रहाणारे इंग्रज दक्षिण भागाला Behind the Bazar म्हणायचे त्याचं भेंडी बाजार झालं आणि तेच अधिकृत नाव झालं. भारतीय शास्त्रीय संगीतात जे घराणी आहेत त्यात हे भेंडीबझार घराणं पण आहे.
.
एका मासिकात मी वाचलं होतं. भैरवी हा सकाळच्या पहिल्या प्रहरात म्हणायचा राग. तेंव्हा मैफिली रात्रंभर चालायच्या आणि पहाटेला संपायच्या. सकाळी सांगता करताना भैरवी सकाळचा राग म्हणून गायला जायचा. नंतर ते भैरवी मैफिल संपताना म्हणतात असं रूढ झालं आणि ती प्रथा झाली. एरवी नियमात चालणारी घराणी यात कुठे आडवी आली नाहीत हे नशीब. मैफिल संध्याकाळी, रात्री जरी संपली तरी भैरवी आळवली जाऊ लागली. अतिशय गोड, चटकन ओळखता येईल असा हा राग आहे. ग, रे, ध, नी - सगळे कोमल स्वर आहेत. कठोर, तीव्र काहीही नाही म्हणून मी साने गुरुजी राग म्हणतो याला. मनाला अतिशय 'शांत' करणारा हा 'राग' आहे. त्याचे एखादा स्वर बदलून केलेले, नटभैरव, अहिरभैरव वगैरे प्रकार पण आहेत पण ते अचूक टिपता येण्याएवढी बुद्धी माझ्याकडे नाही. ती नाहीये तेच बरं आहे. स्वर रांग सोडून कधी बाहेर येतोय का यावर लक्ष ठेवणारे ट्राफिक पोलिस रसिकत्व करायचंय काय. एखादं गाणं आवडलं आणि ती भैरवी आहे हे मला समजलं नाही तरी मला त्याची खंत वगैरे वाटत नाही. त्या चालीनी दिलेला आनंद महत्वाचा, राग ओळखून चारचौघात मला फार कळतं हे दाखवणं एवढाच त्याचा उपयोग माझ्या दृष्टीने.
.
सिनेमाच्या गाण्यांचा अर्थ आपण आपल्या आयुष्यात घडलेल्या, घडाव्याश्या वाटणा-या घटनांशी जोडतो त्यामुळे त्यांच्या बरोबर लवकर मैत्र जुळत असावं. अतिशय अचूक शब्दं, चित्रपटातील सिच्युएशन, सुरेल गळा आणि भैरवी म्हणजे कातील प्रकरण. काळजाला हात घालतात अगदी ती गाणी. हे असं नुसतं सांगून ते डोळ्यापुढे येणार नाही. प्रत्येकाची आवडत्या गाण्यांची यादी असतेच तशी माझ्याकडे भैरवीची एका फोल्डरमध्ये आहेत. काही असतील इतरही जी भैरवी आहे हे माहितही नसेल पण अरे हा आपल्या गावचा असं कळल्यावर जशी त्या माणसाबद्दल आपल्याला जरा जास्ती आपुलकी वाटते तसं माझं भैरवी समजल्यावर होतं एवढंच. नौशादच्या दोन भैरव्या मला प्राणप्रिय आहेत, 'बैजू बावरा' मधलं 'तू गंगा की मौज मै' आणि 'गंगा जमना'चं 'दो हंसोका जोडा'. पहिल्यात ती वीसेक वर्षाची होडीत हाताच्या तळव्यात तोंड झाकून बसलेली देखणी मीनाकुमारी अतिशय मोहक आहे आणि दुसया गाण्यात आलेले ते सध्या दुर्मिळ झालेले मोरा, असुअन, भयो, रतिया हे शब्दं. बघा तुम्ही 'मेरा गोरा अंग ले ले' पेक्षा 'मोरा गोरा अंग लई ले' ला काय गोडवा आहे ते. लता 'गजब' 'जुलम' म्हणताना 'ज'चा उच्चार 'ज'हाजातला करत नाही तर 'ज'गातला करते, मुश्किल न म्हणता मुसकील म्हणते ते सगळं कानाला काय गोड लागतं, ऐका एकदा. गाण्याच्या सुरवातीलाच सारंगी की व्हायोलीन जे काही वाजतं तेच इतकं करूण आहे की पुढे काय याची जाणीव व्हावी. एखाद्याला तिच्या तळतळीचा शाप लागेल असं वाटायला लावणारी चाल आहे ती.
.
चिंगारी कोई भडके, जब दिल ही टूट गया तो, जा रे जा रे उड जा रे पंछी, जिया जले जां जले, बेशक मंदिर मस्जिद तोडो, जो भजे हरी को सदा, मधुकर श्याम हमारे चोर, भोर भये पनघटपे, फूल गेंदवा न मारो, मै पिया तेरी (बासरी काय सुंदर वाजवलीये या गाण्यात), हमे तुमसे प्यार कितना (किशोर आणि परवीन, दोन्ही ऐकणीय), इस भरी दुनिया में, ये दिल ये पागल दिल मेरा, ज्योतसे ज्योत जगाते चलो, मिले जो कडी कडी, साकीया आज मुझे नींद नही आयेगी, आया है मुझे फिर याद वो जालीम, ये जिंदगीके मेले, दिल आज शायर है, जैसे राधाने माला जपी, दिल का खिलौना हाये टूट गया, किसी बात पे पर मैं, किसी नजरको तेरा इंतजार, मुझको इस रातकी तनहाईमें, तुम्हे और क्या दू मै - ही सगळी गाणी माझ्या माहितीप्रमाणे भैरवीत आहेत (नसेल समजा एखादं तरी मी फोल्डर काही बदलणार नाहीये). अवीट गोडी, कितीही वेळा ऐका. भैरवीत एकूणच आळवणी, तक्रार, साद घालणं, आठवण हे भाव जास्ती उमटतात असं माझं मत आहे. पोटतिडकीनं बोलताना जसा माणसाचा आवाज पोटातून येतो ना तशी भैरवीतली भावना खूप आतून कुठूनतरी खोलवरून येते. जिव्हारी लागाव्यात अशा काही चाली आणि त्यात गुंफलेले शब्दं आहेत. प्रत्येक गाण्यावर वेगळं लिहिता येईल इतकी सुंदर गाणी आहेत ही.
.
शंकर जयकिशन मधल्या शंकरचा हा अतिशय आवडीचा राग. 'संन्यासी' सिनेमाची सगळी गाणी म्हणे त्यांनी या एकाच रागात केली होती. पण एकूणच त्याची या रागातली अनेक सुरेख गाणी आहेत. बरीचशी अर्थात आरके साठीचीच आहेत. आवारा हु, छलिया मेरा नाम, कहता है जोकर, ऐ मेरे दिल कही और चल, कैसे जाऊ जमुनाके तीर, मेरा जूता है जपानी, प्यार हुआ इकरार हुआ, सब कुछ सिखा हमने, दोस्त दोस्त ना रहा, तेरा जाना दिलके अरमानोका, रमय्या वस्तावैया, बोल राधा बोल संगम, किसीने अपना बनके मुझको (याचा इंट्रो आणि इंटरल्यूड पिसेस इतके सुंदर आहेत की मी एकदा परत त्यासाठी हे ऐकतो), छोड गये बालम, दुनिया बनानेवाले, कैसे समझाउ बडे नासमझ हो - ही त्याची काही गाणी आहेत भैरवीतली. एसजेच्या ब-याच गाण्यांचे इंट्रो, इंटरल्यूड स्वतंत्र चाली होतील इतक्या सुरेख आहेत (आवारा हु, प्यार हुआ, रमय्या, ऐ मेरे ऐका एकदा परत) पण त्याची भैरवीतली तीन गाणी अशी आहेत की त्यापुढे इतर काही नाही. बरसात में हमसे मिले तुम (ठेका, इंट्रो आणि सगळंच अप्रतिम, प्रत्येकी फक्तं दोनच कडवी असलेली दोन गाणी 'राजा की आयेगी बारात' (त्यात 'दिलपे लगेगी ठेस' नंतर जे वाजतं - बहुतेक मेंडोलीन आहे - ते भारी आहे एकदम) आणि अजरामर 'घर आया मेरा परदेसी'.
.
शशी कपूरने आर.के.ला विचारलं होता, 'परत करशील का असं सुंदर गाणं. तो म्हणाला, 'नर्गिस आण, करतो'. त्यातला ठेका वाजवण्यासाठी म्हणे त्याला तो ढोलकीवाला लाला हवा होता, तो सापडेपर्यंत त्यानी ते गाणं रेकॉर्ड केलं नव्हतं. त्यातलं ते खतरा मेंडोलीन आपल्या लक्ष्मी-प्यारेतल्या लक्ष्मीकांत कुडाळकरांनी वाजवलंय. त्यातलं 'आवारा हू' अख्ख्या रशियाला आणि चीनच्या माओला पण आवडायचं. तुर्कस्थानात त्याचा रिमेक पण निघाला होता. कम सप्टेंबर, फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर, घर आया, शोलेची ट्यून ह्या माझ्या कायमस्वरूपी आवडत्या रिंगटोन्स आहेत. 'घर आया'च्या सुरवातीचं ते मेंडोलीन आणि त्याला सोबत करणारा तो ठेका ऐकत रहातो मी अगदी. एकतर आधीच दोन कडवी आहेत फक्तं त्यामुळे आंबावडी लवकर संपल्याचं जसं दु:खं होतं तसा मला ते गाणं संपत आलं की होतं. कालातीत गाणी ही. सिनेमा कुठला, संगीतकार, गायक कोण हे माहित नसलं तरी ऐकणारा कान देऊन ऐकेल अशी ही गाणी.
.
अगदी अलीकडची आवडलेली आणि कायम ऐकावीशी वाटणारी भैरवी म्हणजे 'चिन्मया सकल हृदया'. आनंदगंधर्व भाटे पोटातून गातात अगदी. असे चित्रपट म्हणून थेटरात बघावेत. तो मोठा पडदा आणि ते आर्त स्वर. आत हलतं काहीतरी. मोकळ्या माळरानावर गाणारे बालगंधर्व आणि तो तापलेला, खणखणीत आवाज. तंतुवाद्यच ते गळ्यातलं. पोटातून निघून स्वरयंत्रापर्यंत ज्या नसा, शीरा जात असतील त्यावर घासून आलेला आवाज तो. मला कायम प्रश्नं पडत आलाय, एवढं सुंदर गाणं म्हटल्यावर त्यांचे शरीरातील अणुरेणु किती तापत असतील, त्यांच्या सुखाचा आलेख कुठल्यातरी यंत्रावर काढता यायला हवा. समागमानंतर येणा-या तोडीचा थकवा येत असावा. अशी भैरवी संपल्यानंतर कुणीही टाळ्या वाजवू नयेत खरंतर, निरव शांतता हवी. गायकाचा देहतंबोरा थांबलेला वाटला तरी त्या तारांची कंपनं चालूच रहात असतील काही काळ, त्यांना शांत व्हायला अवधी द्यायला हवा. अशा सुखाला सुद्धा चव असते. ती शांततेत चाखता येते. एक अनाम ठेवा मिळाल्याचा आनंद गायकाला होत असावाच पण आपल्याबरोबर श्रोत्यांनाही तो पोचवू शकलो हा दुप्पट आनंद मिळत असणार. अशी गाणी ऐकली की आपल्याला त्यातलं काही येत नाही याची मला खंत वाटते. स्वांतसुखाय आपण करतोच असतो, दुस-यालाही आनंद मिळेल अशी काही कला अंगात हवी.
.
'जिव्हाळा' चित्रपटातली 'लळा जिव्हाळा शब्दच खोटे' ही एक कातर भैरवी आहे, गदिमांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात राम गबालेंना अर्जन्सी होती म्हणून लगेच कागद घेऊन त्यांनी झरझर लिहून दिलंय हे गाणं. तेंव्हा त्यांनी 'कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया, सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही' असं जिव्हारी लागणारं लिहिलंय. परकायाप्रवेश अजून तो काय वेगळा असतो. लेखक, कवी, गीतकार, संगीतकार पडद्यावर नसतील येत पण त्या पात्राच्या भूमिकेत जाऊन त्याला काय वाटतंय हे किती परिणामकारकरीत्या दाखवू शकतात यावर त्या कलाकृतीचं आयुष्यं ठरतं. त्यातलं बाबूजींच्या आवाजातलं 'कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही' ऐकताना आत कुठेतरी तूटणं म्हणजे काय ते कळतं. 'बाबुल मोरा'वर मी आधीही लिहिलंय त्यामुळे लांबी वाढवत नाही उगाच. हृदयनाथ, जगजितसिंघ, भीमसेन, सैगल सगळ्यांचं ऐकलंय पण पहिला ठसा सैगलचा, अमिट आहे तो. गळ्यात पेटी अडकवून जाणारा सैगल, लाईव्ह रेकॉर्डिंगसाठी त्याच्यामागे अंतर ठेऊन चालणारा वाद्यवृंद. चेहरे रडवेले करून, हुंदके काढून दु:खं पोचतंच असं नाही. उलट साधेपणानी बोललेलं पायात काटा रुतावा तसं रुततं.
.
आता मला कायमस्वरूपी आवडलेल्या शेवटच्या दोन भैरवी. दोन्हींचा संगीतकार एकंच. जिंगल्स, मालिका शिर्षक गीतांचे बादशाह अशोक पत्की. दूरदर्शनसाठी अतिशय घाईत अनेक भाषात, अनेक दिग्गज कलाकारांना घेऊन केलेलं 'मिले सूर मेरा तुम्हारा', अनेक भाषातून एकाच रागातली एकंच भावना किती वेगवेगळी दिसते. ओपनर भीमसेन आणि स्लॉग ओव्हरला लता मंगेशकर. इतक्या वेळा ऐकून सुद्धा अजूनही लताबाईंचा आवाज आला त्यात की मला मोहरून गेल्यासारखं होतं. संपूर्ण अर्थ माहित नसताना हजारोंना पाठ असणारं हे गाणं असावं. त्यांची दुसरी भैरवी म्हणजे शांताराम नांदगावकरांनी लिहिलेलं 'सजल नयन नित धार बरसती'. हे गाणं कितीही वेळा मी ऐकू शकतो. कडकडे काही फार आवडीचे गायक नाहीत माझ्या. पण 'वद जाऊ कुणाला शरण' म्हणजे आशा खाडिलकर तसं हे गाणं त्यांचंच. त्यातल्या 'तुझ्याविना विषधारा होती' मधला 'ष' कसा म्हटलाय ऐका एकदा. हृषीकेश बडवेनी पण सारेगमला छान म्हटलं होतं ते. निरव शांततेत ऐकावीत ही गाणी. हेडफोन असला तर समाधी अवस्था. आजूबाजूला कितीही गोंगाट असला तरी रस्त्यावर पडलेला दारुडा कसा निवांत, काळजी संपल्यासारखा झोपलेला असतो तशी शुद्ध हरपून गेल्यासारखं ऐकता यायला हवं.
अशी लक्षात न राहिलेली, माहित नसलेली त्या रागातली अनेक गाणी असतील. उल्लेख केलेली पण त्या रागात नसलेली ही गाणी असतील वरती. शब्दं लक्षात न राहिलेल्या यातल्या ठूम-या ऐकल्या आहेत. 'मी डोलकर डोलकर'ची मूळ पंजाबी चीज, माऊली गुरुमाउली, रसके भरे तोरे नैन, बोला अमृत बोला ऐकलंय. अजून कुणी कुणी माहित असलेली गाणी सांगेल, ती ही ऐकेन. मुळात ती अमक्या रागात आहेत म्हणून आवडलीत असं नाही. मूळ नुसरत फतेह अलीच्या गाण्यावरून घेतलेलं 'तू चीज बडी है मस्तं मस्तं' भीमपलास आहे हे कळलं म्हणून जास्ती आवडतं अशातला काही भाग नाही. फक्तं आडनाव 'दिक्षित' दिसलं तर आपण जरा उत्सुकतेने बघतो, त्यातलं आधी काहीतरी आवडलेलं असतं, एवढंच. :)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved