व्हॅलेँटाईन्स डे...

व्हॅलेँटाईन्स डे...
महागडी गिफ्टस्, मूवी, लॉँगड्राइव्ह, सारसबागेत चक्कर, कुठल्यातरी कोपऱ्‍यात बसून काही मोक्याचे क्षण, डिनर-ड्रिँक
- शहरातलं Valentine's.
आज त्याने मुद्दाम तिला आवडणारा टिशर्ट घातलेला. सकाळपासून सायकलवरुन दोनदा चक्कर मारुन तिच्या एका "श्माईल"साठी त्याची धडपड सुरु होती... दुपारी माडाच्या बनात भेटायला जातांना तिने त्याच्या आवडीचा नारळीभात डब्यात नेला होता... त्याने जत्रेतून आणलेली शिँपल्यांची कर्णफूलं समोर धरताच आनंदानं लाजून तिचा चेहरा लाल झाला.
- गावाकडचं Valentine's
अंगात ताप असतांनाही तो शाळेत गेलाच... मधल्या सुट्टीत त्याने तिच्या बॅगमध्ये गूपचूप चॉकलेट ठेवलं... शाळा सुटल्यानंतर त्याच्या बॅगमध्येही चॉकलेट सापडलं... तिने त्याला दिलेल्या ओळखीच्या स्माईलने त्याचा अख्खा दिवस साजरा झाला.
- शाळेतला पहिलावहीला गूपचूप Valentine's !
लोकांघरची कामं करुन दमलेल्या गंगीने झोपडीतल्या कोपऱ्‍यात चारही पोरांना झोपवलं. चौघं पोरं झोपलेली पाहून नाम्यानं गंगीच्या केसात कामावरुन येतांना आठवणीने आणलेला गजरा माळला... गंगीने लाजून दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला...
- झोपडीतला Valentine's
माधवरावांनी आज तो ब्राऊन शर्ट घातला होता. टेपवर फुलो के रंग से गाणं लावलं. हे तिचं आवडतं गाणं... फुलांनी त्यांच्या पत्नीचा फोटो सजवला होता. डोळ्यात भरल्या आसवांनी, फोटोशी बोलत नेहमीचा चॉकलेट केक कापला... त्यांच्या फोटोपुढेच गजरा ठेवला... तिच्याशिवाय हा त्यांचा पहीलाच Valentine's.
सुभे... उठ ! फिरायला जायचंय... लगेच उठ... सुभे
सकाळी Walkवेळी कामत आजोबां.
अहो कामत... गोळ्या घ्या... लगेच. माझ्यासमोर... कामत आजी दुपारी
अगं... पाय दुखत असतील ना... दाबून देतो... - अहो... तुमच्या डोक्याला तेल लाऊन देते...
रात्री एकमेकांना.
- आजी आजोबांचा रोजच Valentine's !!
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved