महाशिवरात्र

उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या कुशीत केदारनाथ आहे. हा परीसर शिवलीलांनी प्रेरीत असा अद्भूत आहे. बाबा केदारनाथ, गौरीकुंड, गणेश जन्मस्थान अशी अनेक स्थळे तिथे आहेत, यातलं अजून एक महत्वाचं स्थळ, केदारनाथपासून २० किमी अंतरावर असलेलं रुद्रप्रयाग जिल्ह्यातलं "त्रियुगीनारायण"...
..
त्रियुगीनारायण हे शिव पार्वतीचे विवाहस्थळ. जिथे साक्षात महादेव आणि पार्वती यांनी श्रीविष्णूच्या साक्षीने विवाह केला. त्या घटनेची साक्ष म्हणून अखंड धुनी तिथे आहे. साळीच्या लाह्यांची आहूती त्यात द्यावी लागते. तिन युगांपासून अखंडपणे ती धुनी सुरु आहे. त्यामुळे त्रियुगी - आणि विष्णूचे मंदीर असल्याने नारायण अशी ओळख त्या मंदिराची आहे. इथून गरम पाण्याचे झरे वाहतात. पार्वतीने शिवशंकरांच्या प्राप्तीसाठी गौरीकुंड येथे तप केले, गुप्तकाशी येथे मागणी घातली आणि त्रियुगीनारायण येथे विवाह केला.
.
केदारनाथपासून जवळ असुनही गर्दीपासून अलिप्त असं नयनरम्य, शांत ठिकाण आहे. मंदिरही जुनं साधं बांधकाम असलेलंच ! साक्षात देव याठिकाणी विवाह करुन गेले ही भावना तिथे रोमांच उभे करते...
.
शिवपार्वतीचा विवाह झाला ती रात्र म्हणजे महाशिवरात्र !
स्मशानयोगी, गुढ, अनादी, अनंत आणि साक्षात शक्ती म्हणजे महादेव. ज्यांचं अस्तित्व आहे. जे मूळ आहे. !
ॐ नमः शिवाय .... बम भोले ... !
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved