Indian Sanitary Napkin
एका पुरुषाने बनवले उपयुक्त आणि
स्वस्त देशी सॅनिटरी नॅपकिन्स
_____________________________
या सॅनिटरी नॅपकिन्सची किंमत आहे फक्त १० रुपये! १० रु. ६ सॅनिटरी नॅपकिन्स. चला यावर अधिक जाणून घेऊया...
मासिक पाळीबद्दल भारतात चारचौघात चर्चा करणे निषिद्ध मानले जाते. परंतु उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने अतिशय स्वस्तात मासिक पाळीमध्ये वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती केलेली असून त्यामुळे लाखो गरीब ग्रामीण महिलांना रोजगारदेखील मिळालेला आहे.
ही व्यक्ती आहे, #शास्त्रज्ञ - #महेशखंडेलवाल! खंडेलवाल उत्तर प्रदेशातील बी. चंद्रकला या महिला आयएएस अधिकाऱ्याला भेटले असता, चंद्रकला यांनी ग्रामीण महिलांची अडचण त्यांना बोलून दाखवली, पण एक भारतीय पुरुष असल्याने असेल किंवा अजून काही, त्यांना मासिक पाळी या प्रकाराबद्दल खूपच कमी माहिती होती. त्यांनी या विषयावर भरपूर वाचलं, वेगवेगळे प्रयोग केले, आणि या अवलियाने एक नवीन डिझाईन बाजारात आणलं.
सॅनिटरी नॅपकिन्सचा बाजार बहुराष्ट्रीय कंपन्यांनी काबीज केलेला आहे. हे सॅनिटरी नॅपकिन्स अतिशय महाग आणि पर्यावरणाला अपायकारक असतात, इतर जैविक कचऱ्याप्रमाणे नष्टदेखील होत नाहीत.
श्री. महेश खंडेलवाल यांनी 'वुई-We' या नावाने आपला उद्योग सुरु केला. याची किंमत केवळ १० रु. असून एका पाकिटात तुम्हाला ६ सॅनिटरी नॅपकिन्स मिळतात. हे सॅनिटरी नॅपकिन्स पर्यावरणाला अनुकूल आहेत. बाजारातल्या सॅनिटरी नॅपकिन्समध्ये पॉलीमरचं प्रमाण जास्त असतं(१.५ ते २ ग्रॅम) तर We च्या सॅनिटरी नॅपकिन्स मध्ये हे प्रमाण केवळ ०.७ ग्रॅम एवढंच आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या सॅनिटरी नॅपकिन्समधील पॉलीमर आणि फायबर चिकटवायला रसायने वापरतात जे पर्यावरणाला आणि शरीराला अपायकारक आहे, तर We च्या सॅनिटरी नॅपकिन्समध्ये हेच काम उष्णतेचा वापर करून केले जाते, नंतर पॉलीमर आणि फायबर वेगळे देखील केले जाऊ शकतात.
We चे सॅनिटरी नॅपकिन्स अधिक ओलेपणा शोषून घेतात, शिवाय इतर सॅनिटरी नॅपकिन्स ६ तास काम करत असतील तर We चे सॅनिटरी नॅपकिन्स १२ तास काम करू शकतात. अगदी ग्रामीण आणि गरीब महिलांच्या कामाचे स्वरूप पाहून, त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून, हे सॅनिटरी नॅपकिन्स बनवले गेले आहेत.
जेव्हा ग्रामीण भागात खंडेलवालांनी उद्योग सुरु केला तेव्हा अनेकांनी थट्टा केली, महिलांनी घराबाहेर जाऊन, पुरुषांच्या बरोबरीने काम करणे घरातील पुरुषांना आवडत नसे. पण हळू हळू सकारात्मक बदल जाणवू लागले, ४ पैसे जास्त हातात येऊ लागल्यावर घरातील विरोध मावळू लागला.
स्वस्त आणि मस्त सॅनिटरी नॅपकिन्स सोबतच खंडेलवाल यांनी हे सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याकरता परवडेल असे यंत्र देखील बनवले आहे. या यंत्राची किंमत १ लाख रुपये असून १० महिला दिवसभरात २००० सॅनिटरी नॅपकिन्स बनवू शकतात. या यंत्रासाठी केवळ २ तास वीज पुरेशी आहे. बाकी सर्व काम स्वहस्ते करता येऊ शकतात.
या उपक्रमाचा उद्देश केवळ सॅनिटरी नॅपकिन्स बनवणे एवढाच मर्यादित नव्हता तर, महिलांना रोजगार मिळवून देणे हा देखील होता. सॅनिटरी नॅपकिन्स बनवणे, विकणे, वितरण करणे यातून महिलांना रोजगार मिळालाय. सर्वसाधारण महिला महिन्याला किमान ५-६ हजार रु. कमवू शकते.
यंत्र बनवणे, कच्चा माल पुरवणे, मोफत प्रशिक्षण देणे या सर्व गोष्टी रेड क्रॉस कुटीर उद्योगामार्फत केल्या जातात. वृंदावन, वात्सल्य ग्राम मथुरा, वडोदरा, बुलंदशहर, अशा ठिकाणी We चे प्लँट कार्यरत आहेत.
------------------------------
संपर्क - महेश खंडेलवाल
ईमेल - cmd@polywin.in; kclvbn@hotmail.com
भ्र.ध्वनी - ९८३७०२२९७३, ९८३७०९९१२२
https://goo.gl/5u4fM5
-------------------------------
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आज सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाजारात चांगला जम बनवलेला आहे. एखाद्या देशी कंपनीने बनवलेले सॅनिटरी नॅपकिन्स वापरताना लोक अनेकवेळा विचार करतील, धावपळीच्या वेळी, क्रीडास्पर्धांमध्ये, बसच्या मागे धावताना असे सॅनिटरी नॅपकिन्स चोख काम बजावू शकतील का? अशी शंका मनात येणे स्वाभाविक आहे.
यावर एकच उत्तर - अशी देशी उत्पादने वापरून बघा मग ठरवा, प्रत्येकाची गरज सारखीच नसते. अधिकाधिक मागणी वाढली तर, अधिकाधिक उद्योगाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल त्यात संशोधन आणि सुधारणा होतील.
सरकारने कर लादण्याअगोदर किंवा कोणताही निर्णय घेण्याअगोदर विचार करायला हवा, आपण सर्वसामान्यांना परवडेल असे पर्याय उपलब्ध करून दिलेत का? फक्त कर लादणे आपलं काम नसून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणेदेखील आपले कर्तव्य आहे, हे सरकारला कधी समजणार?
मूळ इंग्रजी पोस्ट - द बेटर इंडिया, २०१५
मराठी अनुवाद - सुचिकांत वनारसे