#मातृदिन #MothersDay पणजी

#मातृदिन #MothersDay
जन्म देते त्या आईइतकंच प्रेम आपल्यावर करणारी अजून एक व्यक्ती असते... आजी !
आपलं आई - आजी यांच्या इतकंच, त्यापेक्षा जास्त कोडकौतूक, अप्रूप कुणाला वाटत असेल तर ते म्हणजे पणजी... ! पणतू बघण्याचंच त्या माऊलीला खूप कौतूक वाटतं, समाधान वाटतं... याची देही याची डोळा पाहीला कौतूकसोहळा भाव पणजीच्या डोळ्यातून वाहत असतो...
...
हा सहवास सगळ्यांनाच लाभतो असं नाही,
पण मला लाभला... नशीबानं ! आणि तो पूरेपूर अनूभवला... माझ्या जन्मानंतर १० वर्ष मी पणजीच्या कौतूकात वाढलो, खेळलो... त्या आठवणी जमल्या... ! लहान होतो तेव्हा त्या क्षणांची किंमत कळली नाही, पण आत्ता जाणवतंय... त्या आठवणी आयुष्यभर पूरतील...
आईने जन्म दिला, आजीने शिकवलं, माईआजींनी वाढवलं ... !
...
आपण झोक्यात झोपलोय, कुणीतरी मांडीवर घेऊन खेळवतंय, गाणी म्हणतंय हे समजायला लागलं तसं माई आजी समोर दिसायच्या... आईचा हात लागल्यावर शांत वाटतं तसं माईआजींनी जवळ घेतल्यावर वाटतं हे जाणवायचं... तूप पोळी माईआजी जवळ घेऊन खाऊ घालायच्या तेव्हा जास्त छान लागायची...
...
घरात काहीही करण्याआधी सगळे माईआजींना विचारतात, त्यांचं ऐकायचं असतं हे मनावर बिंबलं गेलं... आपण सगळे या आजीकडेच राहतोय हे तेव्हाचं ऐकलेलं किती महत्वाचं होतं हे आत्ता कळतंय... रोज पप्पा - आजोबा त्यांना नमस्कार करतात, आपणही करायचाय हे ही समजायचं... !
त्या खऱ्या आधार होत्या हे त्यांच्या नंतर १५ वर्षांनीपण जाणवतंय... !
...
मातृदिनी माईआजींची... पणजींची... कमी सहवास असलेल्या पण आयुष्यभराच्या भक्कम आधाराची आठवण !
वात्सल्य, प्रेम, माया त्या माऊलीनेही भरभरुन दिलं... !
तिच्या आठवणीतून ते आजपण मिळतंय...
आजचा मातृदिन माईआजींना समर्पित !
.
(फोटो माझ्या बारश्याचा आहे.)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved