Indian Tendency

नव्या कोर्‍या रेल्वेगाडीतील चोरीला गेलेले हेडफोन्स आणि एकूणच भ्रष्ट झालेला आपला समाजपुरूष
.

सार्वजनिक संपत्तीचा आदर ठेवण्याची आपल्याकडे पद्धत नाही.

त्यामुळे नव्या कोर्‍या गाडीतल्या एलसीडी स्क्रिन्सची मोडतोड झाली, हेडफोन चोरीला गेले याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हेडफोन सुटे होते, म्हणून चोरीला गेले. एलसीडी स्क्रिन नव्हते म्हणून जागेवर राहिले.

लोकांकडे अलीकडे आपापले फोन वगैरे असतात. ट्रेनमध्ये एलसीडी स्क्रिनचा उद्योग कोणी सांगितला होता असा प्रश्न आता विचारला जाईल.

पूर्वी सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये फूलन देवीला दुरूनच निर्वस्त्र दाखवले तेव्हा लोकांना दया येण्याऐवजी त्यांनी शिट्ट्या वाजवल्या होत्या. मस्तपैकी शिव्या हासडल्या होत्या. असे प्रकार नेहमीच होऊ लागले म्हणून ज्यांना शक्य होते त्या लोकांनी महागाची तिकिटे काढून मल्टिप्लेक्समध्ये जाणे पसंत केले. आता मल्टीप्लेक्समध्येही शांत राहून सिनेमा पाहिला जात नाही. चांगले मॅनर्स आहेत अशी समजुत असलेल्या लोकांच्या सवयी बिघडल्या आणि त्याचबरोबर आजवर मागास असलेल्या समाजातील लोकांकडेही आता पैसा खुळखुळु लागलेला आहे. पैसा तर आहे, परंतु सार्वजनिक ठिकाणी स्वयंस्फुर्तीने पाळण्याची शिस्त अजुन त्यांच्या गावीही नाही. आपण काही ओरबाडत आहोत याची त्यांना कल्पनाच नाही. कारण हे त्यांच्यासाठीचे नवस्वातंत्र्य आहे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे सार्वजनिक संपत्तीचा आदर करण्याची आपल्याकडे पद्धत नाही. आज केवळ हेडफोन उचलून नेले, एलसीडी स्क्रिन्सचे नुकसान झाले म्हणून आपण फुकाचे आक्रंदत आहोत. काही आंदोलनांमध्ये आपण रेल्वेचे डबेच्या डबे पेटवून दिल्याचे पाहतोच की. हेडफोन चोरीला जाणे हे त्यापुढे किती किरकोळ आहे! तेव्हा आपण आश्चर्य आणि दु:ख व्यक्त करण्याच्या पलीकडे गेलेलो आहोत.

हा केवळ नागरिकांना झालेला बेशिस्तीचा रोग नाही. राजकारण्यांची जाणीवदेखील अगदी तीच आहे. नीलम गोर्‍हेंसारख्या सज्जन समजल्या जाणार्‍या राजकारण्यांना आंदोलनाचे यश किती बस जाळल्या गेल्या यात मोजावेसे वाटते. त्यांचे संभाषण पकडले गेले म्हणून. ते प्रकरण तर सारेच विसरलेले आहेत. अर्थात बाकीचे राजकारणी वेगळे काही करतात असे नाही.

वर उल्लेख केलेले नवस्वातंत्र्य योग्य मार्गावर आणण्यासाठी, सार्वजनिक शिस्तीबाबत आपल्या बिघडलेल्या सवयी पूर्ववत करण्यासाठी आपण काहीच करत नाही आहोत. पैसे फेकले की दुर्वर्तन करण्याचा आपल्याला परवाना मिळतो अशी आपली समजुत झालेली आहे. हे झाले रेल्वेतले वर्तन, सिनेमागृहातील वर्तन. अगदी वाहतुकीच्या सिग्नलवरचे सर्वांचेच वर्तन आता ठराविक वर्गाच्या पलीकडेचे गेलेले आहे. त्या अर्थाने अशी बेशिस्त सर्ववर्गसमभावाची झालेली आहे.

आता कमी अंतरासाठी त्यातल्या त्यात कमी दराच्या तिकिटांचे हवाई मार्ग सुरू झालेले आहेत. बेशिस्त लोकांची विमानप्रवासाची भीड अजून चेपलेली नाही. ती चेपली की तेथेही असे गैरवर्तन चालू होईल. की तेथील मर्यादित संख्येमुळे नियंत्रण ठेवणे, नियमांचे पालन करवणे शक्य होते?

तिकडे छोटासा देश असलेल्या मलेशियामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीचे आवाहन अगदी रेल्वेतिकिटांच्या मागे छापलेले होते. 'Say No to Hooliganism' अशा आशयाचे ते आवाहनहोते. यातले आपण समाज म्हणून काही करत नाही. सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन सरकार करते तर आपण ते हसण्यावारी नेतो. यात जे मोदींना मानतात तेही सामील आहेत आणि जे मोदींचा द्वेष करतात तेही सामील आहे. अशा बाबतींमध्ये सर्वांचेच एकमत होताना दिसते.

आपला समाजपुरूष अशा पद्धतीने भ्रष्ट झाला आहे. आज हेडफोन घेऊन जाणार्‍या लोकांवर आपण हसत आहोत. हेच लोक आपल्यात, आपल्या कुटुंबात, आपल्या शेजार्‍यांमध्ये दिसतात का पहा. वाहतुक सिग्नलला थांबणे हा वेडेपणा असतो, यावर जवळजवळ सर्वांचे एकमत होण्यापर्यंत आपली प्रगती झालेली आहे. त्यावर उपाय करण्याची इच्छा आहे का? आणि दुसरीकडे समाज म्हणून सुधारण्याची आपली इच्छा आहे का?

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved