भारतीय अभिजात संगीताचा रियाज़


-वर्षा ह्ळबे
आयुष्यात काहीही आत्मसात करायचं म्हंटलं की त्या गोष्टीची सवय करणं, त्याचे पूर्णपणे आकलन करणं, आणि त्याचा सतत सराव केल्यानेच ती गोष्ट आपण काबूत आणू शकतो; तिच्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. त्यात एखादी संगीतासारखी ललित कला असली तर त्यात अजूनच मेहनत आली हे उघडच आहे! ती काही पाककृती नव्हे की दिलेले पदार्थ, दिलेल्या प्रमाणात घातले की हमखास, शंभर टक्के ती पाककृती उत्कृष्ठच होणार! कुठलीही ललित कला ही पंचीन्द्रीयांच्या स्पंदनांमधून जन्माला येते आणि कलाकाराच्या प्रतिभेतून आणि मेहेनतीतून प्रगल्भ होते. संगीताचे पण असेच आहे. एखादा कलाकार जन्माला येतो हे खरं; किंव्हा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे ही तितकचं खरं, पण त्याला रियाज़ाची जोड नसल्यास ती प्रतिभाही काळाच्या ओघात नाश होऊ शकते. संगीत, आणि खास करून भारतीय अभिजात संगीत, हे ईश्वरी मानलं गेलं आहे पण कुठलही संगीत मनाला आनंद देतं आणि रोजच्या रहाटगाडग्यापासून लांब न्हेतं. भौतिकतेच्या पलीकडेही काहीतरी आहे ह्याची जाणीव करून देतं. त्यामुळे ही ललित कला जरी कधीच परिपूर्ण किंव्हा पूर्णपणे निर्दोष होऊ शकत नाही, तरीही तिची साधना करताना ती बरोबर केल्यास, मन लावून केल्यास, “निष्काम कर्मयोग” हया भावनेने केल्यास, आणि आपणच आपले सर्वात कडक समीक्षक बनल्यास, अशा ध्यासाचा परिणाम एका वेगळ्याच स्तराचे संगीत होऊ शकते. जेंव्हा हे अभिजात संगीत पहिल्यांदा शिष्य शिकू लागतो तेंव्हा हे आपण काय शिकतोय असा प्रश्न त्याला पडणं स्वाभाविक आहे, कारण हा संगीताचा सागर एवढा अथांग आहे की त्याच्या ठाव घेणं, किंव्हा त्याच्या परिसीमांचा अंदाज येणं अशक्य आहे. सर्वप्रथम चांगला गुरु भेटणं ही फार मोठी आणि योगायोगाची गोष्ट आहे. खूपदा असं होतं की शिष्य एखाद्या संगीत संस्थेत शिकू लागतो. तिथे एखादा राग एका महिन्याभरात, चार आलाप, चार बोलताना, चार ताना, अश्या स्वरूपात शिकवला जातो. ह्याला अर्थात कारण आहे की त्या संस्थेला ठराविक राग प्रत्येक वर्षी शिकवून संपवावे लागतात ज्यानेकरून अमुक वर्षानंतर शिष्य पदवीधर बनू शकेल. पण अशा शिक्षणाचा तोटा असा होऊ शकतो की प्रत्येक रागाची समृद्धी आणि अथांगता शिष्यापर्यंत पोहोचत नाही. ह्यासाठी शिष्याने स्वतः मेहनत करून, चांगल्या कलाकारांचे गाणे ऐकून, बंदिशीचे, आलापीचे, तानांचे “नोटेशन्” लिहून काढून आणि त्याचा घोकून रियाज़ करून, स्वतःचे त्या रागाचे ज्ञान वाढवू शकतो. पण अखेर ही गुरुमुखी विद्या आहे त्यामुळे हया संगीताचे प्राथमिक शिक्षण एका चांगल्या गुरुकडून होणे अतिशय महत्वाचे आहे. गुरु सगळ्या बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन विद्यार्थाला तयार करतो. पहिला “सा” लावताना तोंडाची ठेवण – तोंड न वेंगाडत गाणे, स्नायूंना ताण न देता स्वर लावणे, आकार लावताना “अ” न म्हणता “आ” लावणे. हया सगळ्या सवयी नीट लागता आहेत ना ह्याची काळजी गुरु घेतो; अगदी शिष्य गाताना बसतो कसा इथपासून! गायला बसताना नेहमी पाठीचा कणा ताठ ठेऊन बसणे, पण त्याच बरोबर खांद्यांचे स्नायू हे ढिले सोडणे, गळ्याच्या स्नायूंना अजिबात ताण न देता, सैल सोडूनच गाणे. हया सर्व गोष्टी जरी शुल्लक आणि छोट्या वाटल्या तरी खूप महत्वाच्या आहेत. जर का एकदा वाईट सवयी लागल्या तर त्या काढणं भयंकर अवघड जातं आणि त्या कधीकधी जन्माची खोड होऊन बसतात. भारतीय अभिजात संगीत हे नेहमी मोकळ्या आवाजात गायले पाहिजे हा तर मूळ दंडक आहे. इथे पाश्च्यात “क्वायर” संगीतासारखं “फॅाल्सेटो” मध्ये गायला अजिबात परवानगी नाही. तार-सप्तकातील स्वर लावताना देखील मोकळ्या आवाजात लावले पाहिजेत. असं म्हणतात की पहाटे साधे तीन ते चार हा ब्रह्मी मुहूर्त असतो. हया अर्ध्या तासात रोज उठून खर्जाचा रियाज़ केला तर गाणं चांगलं होतं आणि आवाज निर्दोष बनतो. आता तुम्ही म्हणाल की खर्जाचा रियाज़ म्हणजे काय? खर्जाचा रियाज़ म्हणजे मंद्र सप्तकातील स्वरांचा रियाज़ – एका पाठोपाठ, “सा, नि़, ध़, प़” किंव्हा “सा, प़, ग़ आणि मग लागेल तो सर्वात खालचा स्वर लावायचा. अशा प्रकारच्या रियाज़ाने आवाजाची गोलाई वाढते आणि आवाज घुमावदार बनतो. ह्याचा अजून एक फायदा म्हणजे आवाज चढायलाही त्रास होत नाही आणि वरचे, म्हणजे तार-सप्तकातील स्वर, छान, स्वच्छ, मोकळे आणि सुरेल लागतात. रियाज़ करताना कधीकधी असा प्रश्न पडू शकतो की एखाद्या रागाचा रियाज कसा करायचा? संगीत क्षेत्रातील उस्तादांनी सांगून ठेवले आहे की ह्याकरिता “खंडमेरू” किंव्हा “मेरुखंड” पद्धत खूप उपयोगी पडते. हया पद्धतीप्रमाणे कुठल्याही रागाचे स्वर घेऊन, त्यातील प्रत्येक स्वर-समूहाची अक्षरशः चिरफाड करणे; जेणेकरून सर्व शक्य संयोग तयार होतील आणि रागाच्या मूळ मांडणीला धक्का न पोहोचवता, ते संयोग गायले जाऊ शकतील. उदाहरणार्थ, राग भूप घेतल्यास, त्याचे आरोह आणि अवरोह आहेत, “सा रे ग प ध सो” आणि “सो ध प ग रे सा”. तर “खंडमेरू” पद्धतीप्रमाणे “ध़ सा रे ग” हा स्वर-समूह घेतला तर त्यात “ध़ सा रे ग”, “ध़ रे सा ग”, “सा ध़ रे ग”, “रे ध़ सा ग”, “ग रे सा ध़”, “ग सा ध़ रे”, “ग रे ध सा”, “ग सा रे ध़”.... असे गणिताच्या दृष्टीकोणातून, २४ संयोग शक्य आहेत. तसेच अनेक वेगवेगळे स्वर-समूह घेऊन त्यातील असेच संयोग तयार करून, हया रागाची समृद्धी लक्षात येऊ शकते. अर्थात, नुसते कागदावर हे स्वर-संयोग लिहून काढण्यात काही अर्थ नाही. ते गळयातूनही तितक्याच कुशलतेने गाता आले पाहिजेत, आणि हे केवळ रीयाज़ानेच शक्य आहे. प्रत्येक राग असा कापसासारखा पिंजून पिंजून त्याची सुंदर, मऊ, मखमली लादी तयार झाली पाहिजे. पूर्वीचे उस्ताद एक एक तान तासंतास घोकत बसायचे! असं केल्यानेच त्यांच्या गाण्यात ती वेगळी गम्मत यायची. काही दिग्गजांचे असेही मत आहे की एखादा राग गळ्यावर चढविण्याकरिता त्या रागातील पंधरा एक तरी बंदिशी आत्मसात करायच्या आणि प्रत्येक बंदिशीच्या मुखडयाच्या अनुशंघाने रागाची बढत करायची. त्या बंदिशिंमध्येच त्या रागाचा आत्मा दडलेला असतो जो आपोआप स्वरांच्या मूर्त स्वरूपात रसिकांसमोर उभा राहतो. कुठल्याही छंदाच्या किंव्हा कलेच्या वृद्धीत रियाज़ केल्याशिवाय गती नाही हे तर निश्चित. त्याचबरोबर तो रियाज़ बरोबर आणि नियमितपणे झाला पाहिजे हे ही तितक्याच महत्वाच. जेंव्हा प्रथम कोणी संगीत शिकू लागत तेंव्हा त्याला वाटू शकतं की किती हे राग आणि ते सगळे कधी शिकून होणार! पण जसजसं गाणं पुढे जातं तसतसं लक्षात येतं की प्रत्येक राग शिकवावा लागत नाही. नंतर नंतर आपले आपल्याला राग बसवता येतात आणि जे गुरूने शिकवलेले राग आहेत त्या रागांच्या साच्यात ते बसवता येतात. जसं म्हंटलं आहे, “इक साधे तो सब साधे!” माझ्या मते प्रत्येक रागाची ओळख होऊन तो गाता येऊ लागण्यापर्यंत तीन पायऱ्या असतात. पहिली म्हणजे हा अमुक एक राग आहे आणि त्याचे चलन असे आहे. दुसरी म्हणजे ह्या रागाच्या चलनानुसार ह्याच्यात असे असे स्वर-समूह शक्य आहेत आणि हा राग अशा प्रकारे गाता येईल. तिसरी म्हणजे हा राग आता मला पूर्णपणे कळला आहे आणि तो आळवून आळवून, त्याचे पलटे घोकून घोकून तो आता गळ्यावर चढवता येणं शक्य आहे आणि हा राग आता मी प्रगल्भपणे गाऊ शकते. त्यानंतर अर्थात जितका तो राग गायला जाईल तितका तो अवतरत जाईल आणि आपले आव्हानात्मक नाविन्य गायका पुढे ठेवत जाईल. हया तीन पायऱ्या चढणं आणि त्या गाण्यात परिपक्वता आणणं ह्यात पुन्हा एकदा रियाज़ाचा मोठा हात आहे. हीच तर भारतीय अभिजात संगीतातील जादू आहे – जुनी परंपरा नव्याने अनुभवायची पण त्याला जोड हवी रियाज़ाची.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved