Kiss
सकाळचा किस्सा. मी गाडी बाहेर काढत होतो, गेट समोरच बसमध्ये स्कूल गोईंग मुले बसलेली होती, बहुदा कुठल्यातरी ट्रिप साठी निघाली होती. त्यांना निरोप द्यायला बऱ्याच जणांचे वडील किंवा आई किंवा दोघेही आलेली होती. मला गाडी काढता येत नव्हती म्हणून त्यांची बस गेली कि, आपली गाडी निघेल, म्हणून मी तिथेच थांबून होतो. सगळी मुले टाटा पप्पा, बाय बाय मम्मी करत होती. माझ्या बाजूच्या खिडकीत एक छोटा मुलगा बसला होता. तिसरी किंवा चवथीचा असेल. प्रचंड उत्साहात होता... बाय बाय सेरेमनी दरम्यानच तो छोटा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला....`` टाटा पप्पा, मम्मीला पण बाय सांगा, आणि मम्मीला एक पप्पी पण द्या''.......... बाप एकदम कावरा बावरा झाला. इकडे तिकडे बघू लागला, पण सगळे जन आप-आपल्या पिल्लाना निरोप देत असल्याने कुणाचे त्या मुलाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते, मी मात्र डोम कावळ्यासारखा बरोबर त्यांच्या मागेच थांबलेला होतो. मी हसत त्या व्यक्तीच्या पाठीवर थाप मारली आणि म्हटले.... चिरंजीवांची आज्ञा ऐकली न?.... पटकन घरी जाऊन पूर्ण करून टाका, काय?...... बावरलेला बाप खदखदून हसला, आणि मी म्हटले चला... आजचा दिवस मस्त जाणार..... आपणही हसलोय, आणि कुणाला तरी हसवले...