Mumbai Local Train Announcer

*पुढील स्टेशन…’ लोकलमधला हा आवाज कुणाचा, माहिती आहे?      आराधना तुंगारे यांचा*
मुंबई :- लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रत्येक स्थानका अगोदर तीन भाषांमध्ये पुढील स्थानक कोणतं आहे हे सांगण्यासाठी उद्घोषणा होत असते. हा आवाज कोणाचा असेल असा अनेकांना प्रश्न पडतो, ही उद्घोषणा सुरू करण्यात आली होती तेव्हा ती ‘लाईव्ह’ ऐकवली जात आहे की रेकॉर्ड करून असाही प्रश्न अनेकांना पडला होता. ज्या घोषणेकडे सगळ्यांचे कान लागलेले असतात त्यामागचा आवाज आम्ही शोधून काढला आहे.
हा सुंदर आवाज आहे एका मराठी उद्घोषिकेचा, जिचं नाव आहे आराधना तुंगारे. गेली अनेक वर्ष विविध माहितीपटांना आवाज देणाऱ्या आराधना यांच्यासाठी रेल्वे उद्घोषणेसाठीची ही ‘असाईनमेंट’ सगळ्यांपेक्षा वेगळी होती आणि विशेष म्हणजे ती त्यांच्याकडे स्वत:हून चालत आली. यामागची कहाणी देखील रंजक आहे.
साधारणपणे सहा वर्षांपूर्वी त्या फेमस स्टुडियो, महालक्ष्मी जवळच्या विजय साऊंड स्टुडियोमध्ये एका माहितीपटाला आवाज देण्यासाठी आराधना रेकॉर्डिंग करत होत्या. त्यावेळी तिथे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी आराधना यांचा आवाज ऐकताच त्यांच्यासमोर लोकल ट्रेनमधील उद्घोषणा करण्यासाठी विनंतीवजा आग्रह धरला. आराधना यांच्यासाठी हे एक मोठं आव्हानात्मक काम होतं. कारण माहितीपटाला आवाज देणं आणि उद्घोषणा करणं वेगळी गोष्ट होती. कोट्यवधी लोकांच्या कानावर तो आवाज रोजच्या पडणार होता. त्यामध्ये माधुर्य आणि स्पष्टता यांचा समतोल साधायचा होता. मात्र त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. अवघे काही सेंकदांच्या त्या उद्घोषणेसाठी दीड-दोन तास रेकॉर्डिंग केल्याचं आराधना सांगतात.
उद्घोषणेसाठी सकाळी ९.३० ते १२:३० वाजेपर्यंत रेकॉर्डिंग सुरू होतं. उद्घोषणा दोन वेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड करून घेण्यात आली. पहिला प्रकार होता तो म्हणजे ‘पुढील स्टेशन दादर’ अशी संपूर्ण उद्घोषणा करणे आणि दुसरा प्रकार होता तो म्हणजे ‘पुढील स्टेशन’ असं म्हणून थोडं थांबत स्टेशनचे नाव घेणं. या उद्घोषणा मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये करायच्या होत्या. त्यातही काही स्टेशनची नावे अशी होती जी तीनही भाषात वेगवेगळी उच्चारावी लागत होती. उदाहरणार्थ वांद्रे स्टेशन. हिंदीमध्ये त्याचा उच्चार बांद्रा करावा लागत होता, इंग्रजीमध्ये बोलताना हाच शब्द थोडा हेल काढून बोलावा लागत होता तर मराठीमध्ये म्हणताना वांद्रे असं म्हणावं लागत होतं. ३० सेकंदात या उद्घोषणा बसवणं हेदेखील आव्हान होतं, असं आराधना यांनी सांगितलं. इतकं सगळं असूनही रेकॉर्डिंग जवळपास ३ तासात पूर्ण झालं.
आराधना यांनी याआधी राजधानी एक्सप्रेसमध्ये राज्य बदलत असताना प्रत्येक राज्याबद्दल माहिती देणारी उद्घोषणा रेल्वेसाठी रेकॉर्ड केली होती. लोकल ट्रेनमधील या उद्घोषणेसोबतच आराधना यांच्याकडे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्टेशनवर केल्या जाणाऱ्या उद्घोषणेचंही काम आलं. आराधना यांनी या उद्घोषणांसदर्भात एक छानसा किस्साही सांगितला.
मुंबईतील चर्चगेटहून दादरकडे येत असताना काही महिला आणि लहान मुलं मुंबई सेंट्रलला गाडीमध्ये चढले, त्याचवेळीस आराधना यांना फोन आल्याने त्या मोबाईलवर बोलत होत्या. फोन ठेवताच क्षणी त्या महिलांनी त्यांना विचारलं की हा आवाज तुमचाच आहे ना, यावर त्या हसून हो बोलल्या. बँकेत किंवा कामासाठी कंपन्यांमध्ये गेल्यावर तिथे लोकं जेव्हा आराधना यांच्याशी बोलत असतात तेव्हा आपल्या समोरची व्यक्ती ही लोकलमध्ये उद्घोषणा करणारी व्यक्ती आहे हे त्यांच्या पटकन लक्षात येतं, असही अनुभव त्यांनी सांगितला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणारं स्मित, आदर आणि ‘सेलिब्रिटी’ भेटल्यासारखे भाव झळकताना पाहून केलेल्या कामाची पावती मिळाल्यासारखं वाटतं, असं त्या सांगतात.
आराधना यांनी दूरदर्शनमध्ये निवेदीका म्हणून काम केलं आहे. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी अनेक माहितीपटांना आवाज दिला. डिस्कव्हरीच्या अनेक माहितीपटांमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आहे. त्यांची आई शोभा तुंगारे या दूरदर्शनच्या वृत्तनिवेदीका होत्या. ज्यांचा चेहरा ८० च्या दशकातील अनेकांना आजही स्पष्टपणे आठवतो. आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळेच इथपर्यंत पोहोचू शकले असं आराधना अभिमानानं सांगतात.
(साभार)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved