२००० च्या नोटेतली चीप

गेल्या महिन्यात चलनात आलेल्या दोन हजारच्या नोटेमध्ये ‘चीप’ बसवण्यात आली असून, पाताळात ती पुरून ठेवली तरी तिचा माग काढणे शक्य होईल, अशा वावडय़ा समाजमाध्यमांतून उठल्या. मग रिझव्‍‌र्ह बॅँकेने नोटेमध्ये असे काही नसल्याचा खुलासाही केला. गेल्या काही दिवसांत सरकार दोन हजार रुपयांच्या जेवढय़ा नोटा बाजारात आणत आहे, त्यातील बऱ्याच नोटा साठवणुकीमुळे बाजारातून गायब होत आहेत. त्या नोटा छापे घालून पकडण्याचे आणि जप्त करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे.  त्यामुळे  अशा सूक्ष्म ‘चीप’ची चर्चा पुन्हा सुरू झाली. या पाश्र्वभूमीवर या छापेसत्रामागची आधुनिक व तांत्रिक बाजू विशद करणारा हा लेख...
.
८ नोव्हेंबर रोजी सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. या निर्णयाचे स्वागत काही लोकांनी केले तर विरोधकांनी त्याचा निषेध केला. दोन हजारची नवीन नोट बाजारात आणणार असल्याची घोषणा रिझव्‍‌र्ह बँकेने आधीच केली होती. तेव्हा काही तरी वेगळे घडणार आहे याची पुसटशी शंका अर्थतज्ज्ञांना, पत्रकारांना आली होती आणि तसे घडलेही. मात्र आता आलेल्या अनुभवानुसार सरकार दोन हजार रुपयांच्या जेवढय़ा नोटा बाजारात आणत आहे त्यातील बऱ्याच नोटा साठवणुकीमुळे बाजारातून गायब होत आहेत. काही ठिकाणी या गरसाठवणीत भ्रष्ट बँक अधिकारी सामील असल्याचीही शंका घेतली जात आहे. कारण बँकेच्या सहकार्याशिवाय इतक्या मोठय़ा प्रमाणात नोटा उपलब्ध होऊ शकणार नाहीत. अशा नोटगळतीमुळे सामान्यांना छोटय़ा रकमांच्या नोटा मिळणे दुरापास्त होत आहे, असे सर्व ठिकाणी नजरेस येत आहे. त्यामुळे साठवलेल्या नोटा धाडी घालून पकडण्याचे आणि जप्त करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे. या धाडी सत्रामागची आधुनिक, तांत्रिक बाजू विशद करण्याचा हा प्रयत्न. यातील सर्व माहिती ही शास्त्रीय असून त्यात काल्पनिक विज्ञान साहित्याचा काही संबंध नाही. या धाड सत्रांमुळे आता या तंत्रज्ञानाकडे गंभीरपणे बघितले जाऊ लागले आहे. सुरुवातीला हा थट्टेचा विषय होता आणि त्याची गणना काल्पनिक ‘साय-फाय’  अशी होत होती. परंतु आता मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या दैनंदिन जीवनातील कक्षा किती रुंदावल्या आहेत याची चुणूक या पावडर चीप तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे.  एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करताना सरकारने या नोटेत एक चीप टाकली आहे, असा बोलबाला तेव्हाच झाला होता. या योजनेला विरोध करणाऱ्या सर्व मान्यवरांनी तेव्हा या कल्पनेची यथेच्छ टिंगल उडवली होती. तेव्हा त्यांचे म्हणणेही सयुक्तिक वाटत होते, कारण एवढय़ा पातळ नोटेत चीप कुठून येणार? पण तेव्हापासून प्रस्तुत लेखकासारखे काही लोक असे तंत्रज्ञान अस्तित्वात असल्याचे छातीठोकपणे सांगत होते. अगदी सुरुवातीला याचा उलगडा काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये झाला. त्यानुसार फेब्रुवारी २००८ सालच्या अमेरिकन सायंटिस्ट मासिकाच्या अंकात पृष्ठ क्रमांक ६८ वर ‘इनोव्हेशन्स’या सदरात, या पावडर चीप तंत्रज्ञानाविषयी एक लेख प्रसिद्ध झाला आहे. हे तंत्रज्ञान मोठय़ा प्रमाणात प्रथम २००५ साली Expo 2005 – World Fair in Aichi, Japan या जागतिक तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या वेळी प्रवेश तिकिटासाठी वापरण्यात आले होते. या प्रदर्शनात प्रवेशासाठी एकही बोगस तिकीट वापरले गेले नाही. कारण सर्व पासेस, तिकिटे आरएफआयडी (आरएफआयडी – Radio Frequency Identification) तंत्रज्ञानाची मदत घेऊन बनवली गेली होती. या प्रदर्शनाला दोन कोटींहून अधिक लोकांनी भेट दिली होती. पण एकही बोगस तिकीटधारक आतमध्ये प्रवेश करू शकला नाही. खोटी तिकिटे किंवा पासेस वापरून प्रवेश मिळवणे आरएफआयडी तंत्रज्ञानामुळे अशक्यप्राय होते. ०.४ मिलिमीटर आकाराच्या आणि ०.०६ मिलिमीटर जाडीच्या या पावडर चीपमध्ये असलेला युनिक ओळख क्रमांक रेडिओ लहरींद्वारे प्रसारित केला जातो, ज्यामुळे खोटी तिकिटे किंवा पासेस, स्कॅनर सहज शोधू शकतो. वरील प्रदर्शनाच्या वेळी प्रवेशद्वारावर असे स्कॅनर बसविण्यात आल्यामुळे एकही बोगस तिकीट नजरेतून सुटले नाही.
.
आपण घरात वापरतो त्या टाल्कम पावडरमधील अगदी एका सूक्ष्म कणाएवढी रासायनिक पावडर अशा प्रकारच्या प्रत्येक कागदपत्र, नोटेत असते. त्यामुळे आरएफआयडी तंत्रानुसार तिचा ठावठिकाणा, सुगावा लागू शकतो. अशा अनेक नोटा म्हणजे जवळजवळ एक मोठी प्रवासी बॅग भरेल इतक्या असतील, तर त्या एकत्रित असल्यामुळे त्यातील रसायनांचे कण हे एकाच जागी घनरूपात अनायसे एकत्रित सापडतात. अशा ठोक स्वरूपात या रासायनिक पावडरीचा, पर्यायाने नोटांचा सुगावा (टीप, चुगली, गोपनीय माहितीशिवायही) सहज लागू शकतो. ही चीप बनविणाऱ्या ‘हिताची’ (Hitachi) या जपानी कंपनीने आता याहून पातळ चीप बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार नवीन चीप ०.०५ मिमी आकाराची आणि ०.००५ मिमी इतकी पातळ बनविणार असल्याचे संकेत या कंपनीने मागील वर्षीच दिले होते. या चीपचा ‘प्रत्यक्ष’ आकार पाहता जवळपास ती अदृश्य स्वरूपात असावी असेच वाटेल. बारकोड तंत्रापेक्षा हे तंत्रज्ञान सध्या जरी महाग असले तरी आरएफआयडी टॅग स्कॅन करण्यासाठी वेगळे मनुष्यबळ लागत नाही म्हणून हे तंत्रज्ञान परवडू शकते. म्हणूनच वॉलमार्टसारख्या वस्तुभंडार व्यापारी कंपन्या आजकाल रोजगार खर्च कपातीच्या धोरणामुळे हे तंत्रज्ञान सर्रास वापरताना आता दिसतात. इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन, पब्लिक ट्रान्झिट पासेस आणि पासपोर्ट इत्यादी ठिकाणीही या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ लागला आहे. याबरोबरच वर म्हटल्याप्रमाणे हिताची कंपनीने डोळ्यांना दिसणार नाही इतकी सूक्ष्म चीप बनवली आहे. मात्र अत्यंत सूक्ष्म चीप बनविण्यामागे ‘हिताची’  कंपनीचे मूळ ध्येय मात्र बनावटगिरीच्या विरुद्ध (anti-counterfeiting) तंत्रज्ञान विकसित करणे हे आहे. ‘हे अत्याधुनिक हाय-टेक तंत्रज्ञान दिवसेंदिवस स्वस्त होत जात आहे. यामुळे बाजारातील बनावट गोष्टी कायमच्या बंद होतील’ असा विश्वास आणि आशावाद टोकियोतील नावाजलेले चीप डिझायनर मित्सुओ उसामी यांनी व्यक्त केला आहे.
.
वर उल्लेखिलेल्या जपानच्या ऐची एक्स्पोमध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाबरोबर आणखी एक चीप वापरली गेली, अशा चीपला कोणत्याही बॅटरी अथवा पॉवर सप्लायची गरज नसते. या चीपला ‘म्यू चीप’ असे नाव देण्यात आले आहे. या चीपला एक अ‍ॅन्टेना असते. ती स्कॅनरला वस्तू खरी आहे की खोटी इत्यादी अनेक ‘अ‍ॅन्टी पायरसी’ गोष्टींची माहिती देऊ शकते.
.
१९९९ साली उसमीने एका बडय़ा जपानी टेलिकॉम कंपनीसाठी ‘आय मोड’ सेलफोनची कल्पना मांडली होती. हातातल्या मोबाइल फोनवर इंटरनेट उपलब्ध करून देण्याचे तंत्रज्ञान ‘आय मोड’ने त्या वेळी सर्वप्रथम आणले. (स्मार्ट फोन) त्याची जाहिरात पाहताना उसमीच्या मनात सूक्ष्म चीप निर्माण करण्याची शक्कल डोकावली आणि तेव्हाच त्याने पावडर चीपचे एक कल्पनाचित्र मनात रेखाटले. ज्या तंत्रज्ञानाची त्याने स्वप्ने पाहिली होती, त्यापेक्षा किती तरी अधिक चांगल्या पद्धतीने त्याने म्यू चीप आणि पावडर चीपचे तंत्रज्ञान विकसित केले आणि ते आता अपेक्षेपेक्षा अधिक जोमाने पुढे जात आहे.
.
या तंत्रज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय श्रेणी  निश्चित करणे गरजेचे असते. नोटा किंवा सुरक्षा यंत्रणांसाठी फक्त काही मिलिमीटर (किंवा मोठय़ा आकारमानातील वस्तूंसाठी अवघ्या काही चौरस सेंटीमीटर) रसायनाची गरज असते. आता या परस्परविरोधी तंत्रज्ञान (anti-collision)  विकसित करण्यावर कंपन्या काम करीत आहेत; जेणेकरून एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या चिप्स स्कॅनरला एकाच वेळी वाचता (multitasking) येतील. जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू एकत्र ठेवलेल्या असतील, तिथे त्यांची तपासणी, उत्पादनाचे नाव, उत्पादनाची तिथी याची खातरजमा स्कॅिनग पद्धतीने करताना आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा फायदा होईल. या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक, सरकारी, गुप्तचर यंत्रणा यांच्या उपयोगाच्या अनेक शक्यता आहेत, जसजसा काळ उलटत जाईल, तशा त्या शक्यता व्यक्त होत जातील. उदा. आपल्याकडील २००० च्या नोटा.
.
नोटांत चीप बसवणे हे जरी हितावह असले तरी गोपनीयतेशी संबंधित गोष्टींची घटनात्मक आणि कायदेशीर जबाबदारी काही देशांना घ्यावी लागेल. प्रायव्हसीच्या नियमात हे बसवावे लागेल. पोलीस यंत्रणेलाही या तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो. उदा. दंगल करणाऱ्या जमावावर नियंत्रण आणण्यासाठी आणि पुढील तपासासाठी अशा जमावावर पोलीस ही आरएफआयडी पावडर स्प्रे करू शकतात. दंगलखोरांच्या शरीरावर चिकटलेल्या पावडरच्या कणांमधून अशा व्यक्ती पोलीस शोधू शकतात. त्यासाठी त्यांना स्कॅनरचा उपयोग करावा लागेल. ‘हिताची’ कंपनीने वर म्हटल्याप्रमाणे अँटेना चीप विकसित केली आहे, त्यामुळे वस्तूंचे, दस्तऐवजांचे, वाहनांचे, माणसांचे ट्रेसिंग भविष्यात अधिक प्रभावशाली होईल असे दिसते.
.
या तंत्रज्ञानाचा संबंध सुरक्षिततेशी असल्यामुळे या तंत्रज्ञानात अद्ययावत असे काय घडते आहे याची उघड माहिती सहज मिळणे अवघड आहे. परंतु जपानच्या शास्त्रज्ञांनी गेल्या तीन-चार वर्षांत याविषयी भरीव प्रगती केली आहे हे निश्चित. ‘वॉलमार्ट’साठी तयार केलेली सांख्यिक मोजमाप करण्याची पद्धती नोटांसाठीही वापरता येते हे आता आपल्याकडे अचानक पडणाऱ्या मोठय़ा धाडींमुळे अनुभवास येऊ लागले आहे. कोणत्याही ठिकाणी जर मोठय़ा प्रमाणात नोटा ठेवल्या गेल्या तर त्याचा थांग आता लागू शकतो. प्रत्येक नोटेतील छोटे कण मिळून कणांचा पुंज (Mass) निर्माण होतो व स्कॅनरवर त्याचे अस्तित्व ठळकपणे दिसू लागते. एखाद्या व्यक्तीवर जर संशय असेल, तर त्या व्यक्तीच्या घराच्या, कारखान्याच्या किंवा कार्यालयाच्या आसपास स्कॅनर वापरून पाहणी केल्यास रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारा नोटांचा ठावठिकाणा निश्चित कळू शकतो. पांढरे पसे कुणी नोटांच्या रूपात साठवून ठेवत नाही. पांढरे पसे हे गुंतवणुकीद्वारे साठवले जातात, त्यावर परतावा मिळतो. तसे काळ्या धनाचे नाही, ते बहुधा रोखीत असते (सोने, हिरे, बेनामी जमीन, घर अशा स्वरूपातही असते.) अशा प्रकारे अशा काळ्या रोखीचा सरकारला पत्ता लागतो हे कळल्यावर असे पसे बाळगणारे आता काळे धन लपविण्याच्या दुसऱ्या पर्यायांच्या मागे लागतील (स्पाय व्हस्रेस स्पाय, ‘मॅड’ मॅगेझीनप्रमाणे.)
.
जपानच्या प्राचीन संस्कृतीतच भौतिक गोष्टी अधिक छोटय़ा छोटय़ा (नॅनो) करणे हे रुजलेले आहे. (उदा. बोन्साय) जपानचे इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्समधले तंत्रज्ञानही इतरांपेक्षा खूप पुढारलेले आहे. त्यामुळे जपान्यांकडून असे नॅनो आणि रोबोटिक्स तंत्रातील शोध लागणे साहजिकच आहे. २०२० टोकियो ऑलिम्पिक्समध्ये जपान पूर्ण प्रदर्शन रोबोंकडून नियंत्रित करणार आहे, यात माणसांचा सहभाग अजिबात असणार नाही असे कळते. यामुळे जपान्यांची या क्षेत्रातील मक्तेदारी जगासमोर येईल.
.
http://techon.nikkeibp.co.jp/english/NEWS_EN/20070220/127959/ ‘अमेरिकन सायंटिस्ट’ या मासिकातील लेखाच्या लेखकाविषयी – टीम होर्नयाक हे विज्ञान-तंत्रज्ञानविषयक लेखन करणारे टोकियो येथील प्रसिद्ध लेखक आहेत. जपानी तंत्रज्ञानावर त्यांनी विपुल लेखन केले असून ते ‘लिव्हग द मशिन्स : द आर्ट अ‍ॅण्ड सायन्स ऑफ जापनीज रोबोट्स’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आहेत.
.
संदर्भ :
http://www.cs.virginia.edu/~robins/AFSERYAF¹FOe_Powder.pdf
.
http://techon.nikkeibp.co.jp/english/NEWS_EN/20070220/127959/
.
http://thefutureofthings.com/3221-hitachi-develops-worlds-smallest-AFSERYAF¹FOe-chip/
.
http://www.technovelgy.com/ct/Science-Fiction-News.asp?NewsNum=939
...
साभार

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved