सांताक्लाॅज

सांताक्लाॅज  !!
ख्रिसमसच्या दिवसांत एक काल्पनिक पात्र सर्वांच्या नजरेसमोर येते आणि ते म्हणजे सांताक्लाॅज होय ! लाल गोंडा असलेली टोपी , हिमासारखी शुभ्र दाढी , घेर वाढलेले पोट , पाठीवर बक्षिसांनी भरलेली झोळी व लाल रंगाचा अंगरखा घातलेले हे आजोबा लहान मुलांमध्ये तुफानी लोकप्रिय आहेत . ते आठ रेनडिअरने ओढलेल्या गाडीवर बसून येतात , मुलांनी दिलेल्या यादीप्रमाणे बक्षिसांचे वाटप करतात व कुणाला कानोकान खबर न देता गुपचूप अंधारात गडप होतात असा सर्व बच्चाकंपनीत समज आहे . जगभरातून कितीतरी लाखो करोडो पत्रे डिसेंबर महिन्यात  सांताबाबांसाठी त्यांच्या फिनलंड येथील घरच्या पत्त्यावर पाठवली जातात व लहान मुले मोठ्या आशेने रात्री आपल्या थैल्या , पिशव्या,  साॅक्स खुंटिला अडकवून सांताबाबांच्या येण्याची वाट पाहत झोपी जातात .
.
सांताक्लाॅज ची कल्पना कशी ऊदयास आली , ह्याची एक कथा सांगितली जाते . एकदा एका गरीब माणसाला आपल्या तीन मुलींच्या लग्नासाठी पैशाची अत्यंत चणचण भासली होती . वेळेवर पैसे मिळाले नसते तर कदाचित त्याच्या तीनही मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या गेल्या असत्या. त्या वेळी निकोलस नावाच्या एका सज्जन माणसाने त्यांच्या नकळत त्याच्या घराच्या छतावरील , धूर बाहेर फेकण्यासाठी वापरात येणा-या चिमणीतून , सोन्याच्या काही मुद्रा त्यांच्या घरात फेकल्या . सकाळी ही बातमी जेव्हा त्या गरीब माणसाच्या थोरल्या मुलीने आपल्या बाबांना सांगितली , तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला . त्यांना तो अज्ञात माणूस  देवदूतासमान भासला होता .
.
तो दिवस सरला व रात्र ऊजाडली . त्या दुस-या रात्रीही निकोलसने पुन्हा एकदा गुपचूप पणे सोन्याच्या मुद्रा त्या गरीब माणसाच्या घरात फेकल्या. आपल्या दुस-या मुलीच्याही लग्नाची तरतूद झाल्याची पाहून ते गहिवरून गेले . पण आता ते अस्वस्थ झाले होते . आपल्याला अशी गुपचूपपणे मदत करणारा तो सहृदयी ईसम आहे तरी कोण यांचा त्यांना छडा लावायचा होता . त्यासाठी त्यांनी तिस-या रात्री घराबाहेर पाळत ठेवली . त्यांच्या अपेक्षेनुसार मध्यरात्री सर्व मायरा गाव ( सध्या तुर्की मधील ) गाढ झोपेल्यानंतर एक ईसम त्यांच्या घराकडे येत असल्याचे त्याने पाहिले . तो दुसरा तिसरा कोणी नसून निकोलस असल्याचे त्याने ओळखले . त्याने लगेच निकोलसचे पाय धरले व केल्या ऊपकाराबद्दल त्याचे शतशः आभार मानले . निकोलसनेही झाल्या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याचे त्याच्याकडून आश्वासन घेतले .
.
परंतु , कितीही झाले तरी ही घटना गुप्त राहिली नाही. कालपरवा खाण्याचे वांदे असलेला एक गरीब माणूस रातोरात श्रीमंत झाला ही गोष्ट आगीसारखी सर्वत्र पसरली . नंतर निकोलस ईतका प्रसिद्ध झाला की तो एक आख्यायिका बनला . संत म्हणून मान्यता पावला . समुद्री वादळात ' संत निकोलस आमची मदत कर ' अशी प्रार्थना खलाशी लोकं करू लागले . पुढे पुढे  ' संत निकोलस ' या शब्दाचा अपभ्रंश होवून ' संतकोलस ' ' सांताकोलस ' ' सांताक्लाॅज ' असा शब्द वापरात आला . 6 डिसेंबर 343 या दिवशी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचे निधन झाले .
.
अगदी लहान वयात अनाथ झालेले संत निकोलस हे बच्चेकंपनीत " सांताक्लाॅज " बनून लोकप्रिय झाले. आज सतराशे वर्षांनंतरही लहान मुलांच्या हृदयावर त्यांचेच राज्य आहे .  ध्रुवप्रदेशावर त्यांची खेळण्याची एक फॅक्टरी आहे असा गोड समज त्यांच्यात आहे .  सांताक्लाॅज यांचा पत्ता खालीलप्रमाणे आहे .
.
Santa Claus
Santa Claus Village
FIN 96930 , Arctic circle
Finland .

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved