Yeshu Christ
येशूचा जन्म ही त्याकाळातली अतिशय महत्वाची घटना होती. आपला कृष्ण जसा ‘माणूस’ म्हणून ‘आपला’ वाटतो, तसाच येशूही त्याच्या आयुष्यातल्या मानवी दु:खांमुळे ‘आपला’ वाटतो.. एकाचा जन्म कारावासात झाला, दुसऱ्याचा गोठ्यात.. दोघांच्या जीवावर राज्यकर्ते उठलेले.. दोघांनी मनुष्य समाजाला वागणुकीचे आदर्श घालून दिले. फक्त कृष्णाच्या आयुष्यात जे भरजरी रंग होते, ते येशूच्या आयुष्यात नव्हते.. तरीही, ‘प्रत्येकाला आपला क्रूस आपणच वाहून न्यायचा असतो,’ हा त्याने दिलेला मोठ्ठा धडा..!
येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी सगळं जगच रानटीपणाच्या आधीन होतं. मग ते कुणीही असोत. तोच हिंस्त्र रानटीपणा येशूच्या वाट्यालाही भरपूर आला. कदाचित त्यामुळेच त्याच्यातली करुणा अधिक लखलखीतपणे झळाळून उठली.
येशूची धर्मस्थापना आणि त्याच्या प्रसार, प्रचाराशी मला काही घेणं नाही. तसंही ख्रिस्ती धर्मासाठी येशूपेक्षा जास्त काम त्याच्यानंतर आणि त्याच्या हयातीतही त्याच्या शिष्यांनीच जास्त केलंय. मला येशू ख्रिस्ताबद्दल जे प्रेम, माया आहे, ती ‘माणूस’ म्हणून आहे.
आज त्याचा वाढदिवस..!! त्याने ज्या करुणेचा कायम पुरस्कार केला, त्या करुणेचा स्पर्श प्रत्येक माणसाच्या मनाला थोडा तरी होवो हेच मागणे..!!