गुढ 1

गुढ अनुभव हा प्रकार माझ्याबाबतीत अनेकदा घडतो, आणि घडून गेल्यानंतर आपण काहीतरी विचित्र प्रकार अनुभवल्याची जाणीव होते. यामुळे जिवावरचे अपघातही सहन केले आहेत तर अनेकदा तापात फणफणलोय.
काही गुढ अनुभव, काही कथा याठीकाणी सांगणार आहे.
#गुढ या टॅगखाली...
.
धुळ्यात जुने धुळे भागात साधारण तीन वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. मी त्याच दिवशी पुण्याहून घरी गेलेलो. रात्रभर प्रवास, थोडी कणकण यामुळे दिवसभर झोपलेलोच होतो. ती पावसाळ्यातली संध्याकाळ होती... नुकताच पाऊस पडून गेलेला. लाईट गेलेले, त्यामुळे अंधार होता. पुन्हा पाऊस पडेल आणि बाहेर पडू शकणार नाही, शिवाय दिवसभर झोपून कंटाळा आलेला. म्हणून मी ब्रेड, दुध वगैरे घेण्यासाठी जवळच्या चौकात पायीच गेलो... येतांना परत रिप रिप पाऊस सुरू झाला... अंधार आणि दोन चार डोकी सोडली तर तशी शांतताच होती...
पाऊस सुरू व्हायच्या आत घरी पोहचू अश्या वेगात असतांना मागून ओळखीचा आवाज आला...
"तेजा... अरे थांब...."
अनुजाचा ओळखीचा आवाज होता...
अनुजा : माझ्या मित्राची बहीण...
तिने हाक मारली तर थांबणं भागच होतं. मी हातातली दुधाची बॅग आणि सामान तसंच सांभाळत रस्त्याच्या बाजुला एका शेड खाली येऊन उभा राहीलो. तशीच ती झपझप जवळ आली.
डोक्याला आणि हाताला बँडेज, डोळ्याखाली थोडं खरचटलेलं असा तिचा अवतार पाहून मी जरा हादरलोच...
.
पाऊस पुन्हा सुरू झाला...
.
"काय रे, कधी आलास ?... आणि गधड्या, तु तिकडे गेलास की तिथलाच रे...  विसरतोच आम्हाला'' अशी नेहमीप्रमाणे सुरुवातीची फायरींग झाल्यावर
मी - "माझं सोड, तू हे काय उद्योग केलेस अनू ? कुठे धडपडलीस ? आणि अश्या अवस्थेत भर पावसात, अंधारात कुठे फिरतेय ?"
- काय नाय रे... पडले गाडीवरुन... इतकं नाही काहीच... बाकी तू बोल... कसा आहेस ?
मी : इतकं कसं नाही, तूला खूप लागलंय, आणि मॅड, अश्या अवस्थेत बाहेर फिरतेय... पाऊस कमी झाला की लगेच घरी जा, मी येऊ सोडायला ? कि मक्याला बोलावू ? - आता माझी फायरींग.
- रिलॅक्स तेजा... काहीच होणार नाही... मी जाईन बरोबर... जवळच आहे... तू बरं झालं रे भेटलास, खूप वाटत होतं भेटावसं...
हा संवाद पुढे पाच-सात मिनिटं चालला. पाऊस थांबला, आता पाऊस नाहीय तर पटकन घरी पोहचू म्हणून तिला बाय केलं, मी सोडायला येतो तर ती हट्टाने नाही म्हणाली...
- तेजा, अरे काकू वाट बघत असेल घरी... दुध पण आहे. जा तू... मी जातीय... पोहचली की टेक्स्ट करेन... प्लिज जा... अॅन्ड अॅम टोटली फाइन... डोन्ट वरी...
- फाईन... आता जातो, तू पण हळू जा... टेक्स्ट कर... उद्या घरी आल्यावर बघतो तुझ्याकडे कार्टे...
ती हसत निघून गेली...
.
मी इकडे घरी आलो... तरी पण तिचा तो जखमी चेहरा डोक्यात होता... ती घरी पोहचली असेल की नाही ?..
टेक्स्ट आला का... पण लाईट नसल्यानं मोबाईल डिस्चार्ज...
जरा काळजीतच होतो...
.
त्याच तंद्रीत असतांना बॅगमधलं दुध नासलेलं निघालं... ते पण ऐन पावसात... सकाळपासून चहा नव्हता, दुध आणायला गेलो तर वेळ लागला, त्यातही दुध नासलेलं.... मातोश्रींची चिडचिड होत होती...
"अगं आई, वेळ लागला कारण अनूजा भेटली होती इतक्यात... तीचा अॅक्सीडेंट झाला तर बरंच लागलंय... पावसात, अंधारात तिला एकटं सोडणं बरं दिसत नाही, आणि बऱ्याच दिवसांनी भेटली तर गप्पा करत होतो...
.
आई हे ऐकून किंचाळलीच... झटकन माझ्याकडे आली... अssनुजा... ती कशी भेटेल ?
- कशी म्हणजे ? त्या किंचाळीने मी गोंधळलेला...
- तेजस... तू काय सांगतोय... तुला माहित नाही कां ? आईने थरक्या आवाजात विचारलं...
- काय ?
- अनुजा काल सकाळीच अपघातात वारली... रात्रीच तिचे विधी झाले..
.
हे ऐकून मी ठिकाणीच गोठलो... कसं शक्य आहे ? मला कां नाही सांगितलं ? मग मला ती कशी भेटली ?
.
शब्द ऐकायला दोन क्षण, अर्थ मनात उतरायला एक क्षण गेला... म्हणजे मला अनुजाचा आत्मा भेटला... आपण इतका वेळ एका आत्म्यासोबत होतो... माझं ऋदय वेगात होतं... अंगात प्रचंड घाम... समोर तिचा चेहरा.
डोळ्यांतून अश्रुंच्या धारा सुरु होत्या..
ति गेल्याचं दुःख आणि या प्रकाराची भिती...
पंधराव्या मिनिटाला मी तापाने फणफणलो...
एकुण मी प्रचंड हादरलो होतो.
.
मी दिवसभर झोपूनच होतो त्यामुळे मला हे माहित झालं नव्हतं... आई पप्पा सांगू शकत नव्हते. कारण धीर होत नव्हता.. आदल्या दिवशी मक्याचे मिसकॉल्स होते... मला कळण्याचा मार्गच नव्हता..
.
तिची दृष्टी पडल्यानं दुध नासलं हे आईला लगेच कळलं...
अनुजा मला मोठा भाऊ मानायची,
मी तिला निरोप द्यायलाही नव्हतो.
त्यामुळे जाता जाता ती मला भेटून गेली.
''तू बरं झालं रे भेटलास, खूप वाटत होतं भेटावसं..."
या वाक्याचा आणि तिच्या हसण्याचा अर्थ नंतर कळला.
त्या दहा मिनिटांच्या भेटीनंतर ती स्वप्नातही दिसली नाही. ना घरी पोहचल्याचा तिचा मेसेज आला...
.
मी नंतर पंधरा दिवस तापात होतो...
आईनं बरंच काही केलं... कसल्याश्या बाबा बूवांनाही दाखवलं.. पण अनुजा मला काय करेल ? ती बिचारी फक्त भेटली...
हळू हळू मी सत्य स्विकारलं... भिती गेली...
आजपण धुळ्यातल्या त्या रोडवरुन जातांना, त्या शेडपाशी " तेजा अरे थांब.... काय रे, कधी आलास ?... आणि गधड्या, तु तिकडे गेलास की तिथलाच रे... " चा भास होतो... जखमी अनुजाचा चेहरा डोळ्यासमोर येतो... ते दहा मिनिट आठवतात...
आणि मक्याच्या घरी अनुजाचा फोटो बघून मी
"बघतोय तुझ्याकडे कार्टे..." ची खून्नस देतो...
ती फोटोतूनच हसते...
... त्यादिवशी जातांना हसली तशी...
.
- तेजस कुळकर्णी
#गुढ #तेजस_कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved