दिव्या भारती

आत्महत्या करून मेलेल्या अभिनेत्रींचा रिपोर्ट पाहतांना दिव्या भारती नामक स्वर्गीय सौंदर्य समोर आलं. आणि २३ वर्षांपूर्वी याच काळ्या दिवशी ते गुढरित्या संपल्याचं योगायोगाने आत्ताच समजलं. दिवस संपता संपता का होईना, पण तिच्या अस्मानी सौंदर्याची आणि  तिच्या अल्पावधीतल्या यशाची आठवण काढून श्रध्दांजली वाहिल्याशिवाय तिला ओलांडून पुढे जाता येणार नाही.
.
५ एप्रिल १९९३ च्या रात्री पावणेबाराच्या सुमारास प्रचंड सौंदर्य, गोड गळा, लोभस निरागसता लाभलेल्या या अप्सरेनं वर्सोवातल्या घरी पाचव्या मजल्यावरुन झोकून देत जीवन संपवलं.
.
दिव्या ओमप्रकाश भारती...
१९८८ ते १९९३ या पाच वर्षात तिनं यशाचं शिखर गाठलं. शाहरुख खान सोबतच्या "ऐसी दिवानगी" गाण्याने तिला त्यावेळी तरुणांच्या दिल की धडकन बनवलं. ती गेल्यावर "रंग" आणि ''शतरंज" हे तिचे दोन सिनेमे रिलीज झाले. अवघ्या पाच वर्षात तिनं पंचवीस हिट सिनेमे दिले. तिच्या अवखळपणा, मादक अदांवर अवघं बॉलीवूड कुर्बान होतं. ती आली, तिनं जिंकलं आणि चटका लावून निघून गेली.
.
दिव्या भारती गेल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांना वेड लागलं, अनेकांनी स्वतःला संपवलं, तिच्या अस्मानी सौंदर्यावर जीव ओवाळणारे करोडो होते. वयाच्या अठराव्याच वर्षात तिच्या वाट्याला आलेलं ग्लॅमर स्वर्गीय अप्सरेलाही हेवा वाटावा असं होतं.
.
ती गुढ जगली... आणि गुढ मेली...
चटका लावून...
दंतकथा झाली...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved