गुढ - २

मेलेली माणसं स्वप्नात येण्याचा विषय या ठीकाणी सुरूय... त्यावर मी माझे सत्य अनुभव सांगतोय. या अनुभवांना मी दैवी देणगी समजतो.
.
(१) माझी आजी गेली त्या रात्रीचा हा अनुभव : १९९९
मी सहा वर्षांचा होतो. त्यामुळे इतकं स्पष्ट आठवत नाही. पण एकुण घटना, ते वाक्य माझ्या मनावर कोरली गेलीय. मी तेव्हा सुट्टीत मुंबईत होतो. आजी धुळ्यात.
दिवसभरात रुटीननंतर मला रात्री गाढ झोप लागली. आणि माझी आजी अचानक स्वप्नात आली.
ती रडत होती.
"मी जातेय हा तेजस... मी देवाकडे जातेय... तू खूप मोठा हो... दादांना (माझे आजोबा) आणि माझ्या जयाला (माझे पप्पा) सांभाळ."
आणि आजीने मला जवळ घेतलं... खुप रडली... आणि गेली...
हे स्वप्न इथे संपलं.
मी खडबडून उठलो, आणि आईला जसंच्या तसं सांगितलं...
- असं काहीच नसतं रे, झोप शांत. असं म्हणून आईने मला झोपवलं.
पण अर्ध्या तासात घरुन खरंच आजी गेल्याचा फोन आला.
विशेष म्हणजे ती ज्या साडीत मला स्वप्नात दिसली तीच साडी तिच्या मृत शरीरावर होती.
- ती मला भेटून गेली.
.
(२) अहमदनगरला असलेली माझी समवयस्क आतेबहिण तीन वर्षांपूर्वी २२ नोव्हेंबरला अचानक गेली. नंतर १५ दिवसातच तीचे वडील आणि पुढच्या महिन्यात माझी आत्या सुध्दा वारले... नम्रता माझ्या खूप जवळ होती... सख्या बहिण भावासारखं नातं होतं... आणि त्या तिघांच्या मृत्यूने ते घर उघड्यावर पडलं...
त्या तिघांचे कुठलेही विधी झाले नव्हते.
ती गेल्यावर नम्रता नेहमी माझ्या स्वप्नात यायची. ती नेहमी बसायची त्याच झोपाळ्यावर बसलेली दिसायची. आणि मी तिच्या घराच्या बाहेरुनच तिला बघतोय... भूक लागलीय, खायला दे, तेजा माझ्याशी बोल... इतकंच बोलायची. रक्षाबंधन, भाऊबीज, तिची तिथी यावेळी तर होतंच... 
नंतर आत्या आणि मामा पण दिसायला लागले.
या स्वप्नांचा अर्थ कळत नव्हता...
माझ्या मामाच्या सांगण्याने आम्ही त्यांच्या घरात, तिच्याच चुलत भावाकडून तिघांचे पहिल्या दिवसापासूनचे विधी करुन घेतले.
त्यानंतर ती एकदाही स्वप्नात दिसली नाही.
.
(३) माझी पणजी गेली त्यादिवशी दसरा होता. आमच्याकडे कुळधर्म असल्याने जेवायला उशीर होणार होता. पण जेवण व्हायच्या आधीच ति गेली.
तिचं श्राद्ध वगैरे व्यवस्थित होतं, तरीही दसऱ्याची चाहूल लागली की ती माझ्या आणि माझ्या आजोबांच्या स्वप्नात येते आणि वेगवेगळ्या पद्धतीत भूक लागली, जेवायला वाढ सांगते.
.
हा पुढचा अनुभव अश्यातच घडलाय. आणि यामुळे मी आणि माझे कुटूंबिय हादरलोय...
(४) माझे पणजोबा १९४५ सालातच वारले. त्यावेळी माझे आजोबा १० वर्षांचे होते. त्यामुळे त्यांनाही पुसटच आठवतात, "माझे पणजोबा" हे व्यक्तीमत्व कसे होते, कसे दिसायचे हे जाणून घ्यायची उत्सुकता होती..
त्यांचा एकही फोटो, चित्र उपलब्ध नाही.
आजोबांना पुसटच आठवतात.
माझी पणजी जाऊन पण १५ वर्ष झाली.
त्यामुळे पणजोबा कसे होते हे परफेक्ट कळायचा शेवटचा सोर्सही नव्हता.
एक दिवस आम्ही मूळ गावी गेलो. मी पहिल्यांदाच... तिथे आमचं एक छोटसं घर आहे. त्या रात्री तिथेच झोपलो.
आणि त्याच रात्री स्वप्नात एक मूर्ती माझ्या समोर आली. काळा कोट, भिकबाळी, कोटात ठेवतात तसं घड्याळ आणि पेन ठेवण्याची पद्धत अशी ती जिवंत मुर्ती त्याच घरात दिसली... आणि माईआजी (पणजी) पण.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते वर्णन दादांकडे (आजोबांकडे) केलं. एकदम आश्चर्याने त्यांनी ते ऐकलं. दादांच्या डोळ्यांच्या कडा किंचीत  पाणावल्या... मला तसंच घेऊन त्याच गावात राहणाऱ्या एका जख्खड म्हाताऱ्या आजीकडे आम्ही गेलो...
माझे पणजोबा बाघितलेली, आठवत असलेली एकमेव व्यक्ती... दादांची काकू... वय वर्ष ९९...
तेव्हा मी वर्णन ऐकवतांना त्या आजी डोळे विस्फारुन बघत होत्या... आणि "बाजीराव दादा" असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले. अशीच मूर्ती होती.
मी सांगितलेल्या बारकाव्यांचा पडताळा घेतला गेला.
- मी स्वप्नात माझ्या पणजोबांना भेटलो.
मी आणि दादा, त्या आजी थक्क झालो.
.
स्वप्नांत अनेक दृष्य दिसतात. दृष्टांत मिळतात.
लक्ष दिलं तर त्यातून मिळणारे संकेतही महत्वाचे असतात.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved